खाली तुमच्या साठी मराठी बोध कथा (bodh katha marathi) लिहिल्या आहे. तुम्हाला ह्या बोध कथा वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या कथा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल.
-
बोध कथा मराठीत - Bodh Katha Marathi
- लांडगा आला रे आला
- दोघां भावातील खटला
- स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याची कला
- चोरावर मोर
- उंदीर, कोंबडा आणि मांजर
- प्रेमळ बोल
- संधीचा फायदा
- लौकिक राजा
- बुड बुड घागरी
- उंदराची टोपी
- वाल्याचा वाल्मीकी झाला
- कृतीपेक्षा विचार महत्त्वाचा
- एकीचे बळ मोठे असते
- उपकार स्मरण करणे हेच माणसाचे कर्तव्य आहे!
- लाख मोलाचा देह
- चल रे भोपळया टुणुक टुणुक
- टोपीवाला आणि माकडे
- घामाचा पैसा
- गाढवाचा गैरसमज
- कष्टाचे फळ
बोध कथा मराठीत - Bodh Katha Marathi
1. लांडगा आला रे आला
एका गावात एक धनगर होता. त्याला दीपक नावाचा मुलगा होता. दीपक रोज आपल्या मेंढया घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे. त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत. एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले.
पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, 'लांडगा आला रे आला.' लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, 'कुठे आला लांडगा'. तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला, 'कशी गंमत केली.' शेतकरी संतापले. पण काय करणार, तसेच निघून गेले.
दीपकला मात्र यात गंमत वाटली. दुसर्या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकर्यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा दीपक कसे फसवले म्हणून हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले. तिसर्या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला. दीपक जोरजोरात ओरडू लागला 'लांडगा आला रे आला.' पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय, असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या खाल्ल्या. दीपक आपला झाडावर बसून रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली. पण आता फार उशीर झाला होता.
तात्पर्य : थट्टा उडविणे केव्हाही वाईटच.
संस्कार कथा मराठीत | Sanskar Katha in Marathi
2. दोघां भावातील खटला
एकदा एक गावात, दोघां भावात जमिनीवरून तंटा झाला व मामला कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले.
श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली.
तो म्हणाला, माझ्या वाडवडिलांनी देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे.
यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला.
तात्पर्य : मिळालेले धन हे टिकवून ठेवले पाहिजे आहे.
इसापनीती कथा | Isapniti Stories in Marathi
3. स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याची कला
एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणर्यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले.
त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात? बुद्ध म्हणाले, मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे. मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले, जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते.
पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो. मुलाने विचारले, ते कसे काय? बुद्ध म्हणाले, त्याची जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते. त्याला त्याची चूक कळून आली.
तात्पर्य : ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.
महाभारत कथा मराठीत | Mahabharat Stories in Marathi
4. चोरावर मोर
रानात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरापाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला. 'हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन चोऱ्या करायला लावील,' असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला.
त्या रडणाऱ्या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, 'काय रे? तुला रडायला काय झालं?' तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, 'मी या विहिरीत किती पाणि आहे हे पाहण्य़ासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई-बाबा मला बेदम चोप देतील.' तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचक त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, 'बाळा ! तू हे माझं बोचक सांभाळ; मी तुला तुझी कंठी तुला विहिरीतून काढून देतो.' त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं, तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, विहिरीच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला.
ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला. गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलीसांकडे नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षिस दिले.
लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids
5. उंदीर, कोंबडा आणि मांजर
एका उंदिराचे पिटुकले पिल्लू पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ""आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच.
रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या. दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती.
तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही. हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ""वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव."" तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.
अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi
6. प्रेमळ बोल
एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.' यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे.
त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.'
तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही.
तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi
7. संधीचा फायदा
एकदा, एका मंदिराच्या पुजार्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते पुजार्याला आपल्याबरोबर यायला सांगतात, तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, की त्याचा देवावर विश्वास आहे आणि देव त्याच नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो.
तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येत आणि पुजार्याकडे शिडी टाकतात, पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्यांचाकडे तक्रार करतो, की त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही.
तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस. पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या.
तात्पर्य : आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात, पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे.
मराठी प्रेम कथा | Love Stories in Marathi
8. लौकिक राजा
जनकराजाच्या ज्ञानी अलिप्तपणाची ही कथा. राजा जनक कीर्तन ऐकण्यात दंग होता. कीर्तन अगदी रंगात आले होते. इतक्यात एक रक्षक धावत आला आणि त्याने जनकाच्या कानात हळूच सांगितले, 'महाराज! राजवाडयाला आग लागली आहे.' जनक म्हणाला, 'मी कीर्तन ऐकतो आहे. देवाची भक्ती करतो आहे. आत्ता काही सांगू नको. नंतर ये.' थोडा वेळ गेला.
रक्षक पुन्हा धावत आला. म्हणाला, 'महाराज!आग भडकली आहे. कोठीघरार्पत थोडया वेळातच पसरेल.' तरीही जनक स्तब्धच होता. कीर्तन सुरूच होते. तेवढयात रक्षकाने तिसरी बातमी आणली, 'महाराज! आपला राजवाडा जवळजवळ जळून खाक झाला आहे आणि आता आग शहरात पसरण्याची शक्यता आहे. सार्या प्रजेची घरं जळून खाक होतील.' हे ऐकल्यावर मात्र जनक ताडकन उठला.
म्हणाला, 'किर्तन थांबवा. मी गावात जातो. सगळ्या प्रजेच्या रक्षणाची काळजी मला घ्यावी लागेल. ती माझी जबाबदारी आहे.' म्हणजे राजाला स्वत:चा राजवाडयाचे दु:ख नव्हते. प्रजेचा जीव, मालमत्ता त्याला वाचवायची होती.
तात्पर्य : कर्तव्याला लिप्त आणि स्वत:च्या सुखसोयीशी अलिप्त राहिले तरच व्यक्तीचा लौकिक शतकानुशतके राहतो.
भुतांच्या गोष्टी | Horror Stories in Marathi
9. बुड बुड घागरी
एकदा एका जंगलात उंदीर जातो. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी साखर आणतो'. मांजर म्हणाले 'मी दूध आणतो'. उंदीर म्हणाला 'मी शेवया आणतो'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'.
इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही.
मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.
तात्पर्य : कधीही खोटे बोलू नये.
छान छान गोष्टी मराठीत | Chan Chan Goshti Marathi with Morals
10. उंदराची टोपी
एक उंदीर होता. तो एकदा रस्त्यावरून चालत होता. चालता चालता त्याला एक कापडाचा 'तुकडा' सापडला. तर तो तुकडा बघून उंदराला वाटलं अरे व्वा ! आता आपण याची टोपी शिवून घेऊया. मग तो एका शिंप्याकडे गेला. शिंप्याला म्हणाला, ""शिंपीदादा, शिंपीदादा, मला या कापडाच्या तुकडयाची टोपी शिवून द्या"". तर शिंपी म्हणाला, ""चल हट, मी नाही देत जा"". तसा उंदराला आला राग.
तो म्हणाला ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". शिंपी घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण तो तुकडा, मी टोपी शिवून देतो"". म्हणत शिंप्यानं टोपी शिवून दिली. तसा तो उंदीर गेला, कुणाकडं? परटाकडं ! परटाला म्हणाला , ""परीटदादा, परीटदादा, माझी एवढी टोपी धुवून द्या"". परीट खूप कामात होता. तो म्हणाला, ""नाही रे उंदरा, मला वेळ नाही आता. जा"". तसा तो उंदीर म्हणाला, ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"".
परीट घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपी धुवून देतो"". म्हणत त्याने टोपी धुवून दिली. तसा उंदीर गेला रंगार्याकडे व म्हणला, ""रंगारीदादा रंगारीदादा, माझी टोपी छान लाल रंगवून द्या"". रंगारी म्हटला, ""जा जा, मी नाही देत जा."" तसा उंदीर काय म्हटला? बरोब्बर! ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". रंगारी घाबरला आणि त्यानं टोपी छान लाल लाल रंगवून दिली. मग उंदीर गेला गोंडेवाल्याकडे व म्हणला, ""गोंडेवाले, गोंडेवाले, माझ्या टोपीला चार गोंडे लावून देता का?"" गोंडेवाला बोलला, ""मी नाही देत.
ज्जा"" तसा उंदीर त्याला पण म्हणाला, काय?, ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". तसा गोंडेवाला घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपीला गोंडे लावून देतो"". मग त्याने गोंडे लावून दिले. उंदीर झाला खूष. त्यानं टोपी घातली डोक्यावर आणि मजेत गाणी म्हणत चालला. तिकडून राजा चालला होता. राजाबरोबर होते शिपाई.
राजाने उंदराला बघितले आणि शिपायांना म्हणाला, ""घ्या रे त्याची टोपी हिसकावून"". तशी शिपायांनी उंदराची टोपी हिस्कावली आणि राजाच्या डोक्यावर ठेवली. उंदीर पळाला आणि पळता पळता म्हणायला लागला, ""राजा भिकारी, राजा भिकारी! माझी टोपी घेतली, घेतली"". आता राजाला आला राग. त्यानं डोक्यावरची टोपी काढली आणि उंदराकडे भिरकावली. तशी ती टोपी उंदराने उचलली, झटकली आणि पुन्हा डोक्यात घातली आणि म्हणायला लागला , ""राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक, ढुम!
मराठी लघु कथा | Marathi Laghu Katha
11. वाल्याचा वाल्मीकी झाला
पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो, रानात एक मार्गातून येणार्या-जाणार्या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशावर आपले घर चालवायचा. त्याला एकदा नारदमुनींनी बघितले. नारदमुनींना वाईट वाटले. वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला, तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल.
ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले, ''अरे, तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे.'' त्यावर वाल्या कोळी म्हणाला, ''मी हे पाप माझ्या बायका-मुलांना खायला-प्यायला मिळावे म्हणून करतो.'' तेव्हा नारदमुनी म्हणाले, ''तू त्यांच्यासाठी करतोस, तर मग जा. त्यांना विचार की, मी पाप करून सगळे तुम्हाला देतो. तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का?'' वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका-मुलांना विचारले. तेव्हा ती म्हणाली, ''तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही.
तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळविता, तर त्याचे पाप तुम्ही भोगा.'' हे ऐकल्यावर वाल्या कोळ्य़ाला वाईट वाटले. आपण एवढी वर्षे निरपराध लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्चात्ताप झाला. तो लगेच नारदमुनींना शरण गेला आणि म्हणाला, ''आपण मला क्षमा करा. या घोर पापातून मला मुक्त करा.'' तेव्हा नारदमुनी प्रेमाने म्हणाले, ''वाल्या, तुला पश्चात्ताप होतोय ना? आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू 'राम राम' असा नामजप कर. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करत बस. मी लगेच जाऊन येतो,'' असे म्हणून नारदमुनी गेले. आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला.
त्याला 'राम राम' असे म्हणता येत नव्हते; म्हणून तो 'मरा मरा' असा नामजप करायचा; पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता. असे करता करता एक दिवस गेला, चार दिवस गेले, एक आठवडा झाला, तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता. १ मास, २ मास असे करत करत वर्षे झाली; पण नारदमुनी आले नाहीत; पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता. तो ज्या रानात बसला होता, तेथे वाल्या कोळ्य़ाच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले, तरीही वाल्या कोळी उठला नाही. हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले. त्याने मनाशी निश्चय केला होता की, नारदमुनींनी सांगितलंय ना? ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता-पिता शेकडो वर्षे नामजप करणार्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, ''मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे.
तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो. तू आता वाल्या कोळी नाहीस. आजपासून वाल्मीकी ऋषी आहेस. असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला.'' याच वाल्मीकी ऋषींनी 'रामायण' लिहिले. वाल्मीकी ऋषी फार प्रेमळ होते. तात्पर्य : संगतीमुळे आपण चांगले बनतो; त्यामुळे नेहमी आपण चांगल्याच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे.
छान छान गोष्टी मराठीत | 20 Chan Chan Goshti Marathi
12. कृतीपेक्षा विचार महत्त्वाचा
एकदा, एका ठिकाणी ३ मजूर दगड फोडून मंदिर बनवत होते. एका माणसाने तिघांना विचारले, ""तुम्ही काय करत आहात ?"" पहिला मजूर : दिसत नाही का? दुसरा मजूर : पोटासाठी दगड तोडतोय. तिसरा मजूर : दगड तोडता तोडता गात उत्तरला, भगवंताचे मंदिर बनवतो आहे."
तात्पर्य : आपण काय करतो, हे महत्त्वाचे नाही, तर आपला त्याविषयी दृष्टीकोन काय आहे, हे महत्त्वाचे आहे.
13. एकीचे बळ मोठे असते
"वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खडयात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिल्लाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत.
परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्या एका मोठया खडयात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.
14. उपकार स्मरण करणे हेच माणसाचे कर्तव्य आहे!
एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली.
तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर, एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने, तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले.
त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, 'थांबा, त्यांने स्वत:चा किंमतीएवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.'
तात्पर्य : माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे.
15. लाख मोलाचा देह
एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलवायला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनात आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण बदल्यात तु मला तुझे डोळे दे.' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.'
भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस का?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. शेवटी व्यापारी म्हणाला, 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस? कष्ट कर पैसे मिळव'.
16. चल रे भोपळया टुणुक टुणुक
एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. तिची लेक दुसर्या गावाला रहात होती. रस्त्यांत मोठे जंगल होते. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'.
पण म्हातारी होती हुशार. ती म्हणाली, 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग तू मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला, 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग तू मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.
लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली, 'चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्यावर भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.
अशी होती म्हातारी हुशार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.
17. टोपीवाला आणि माकडे
एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना तो थांबतो व झाडाच्या खाली जरा वेळ विश्रांती घेतो. तेव्हा तेथे झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोडया वेळाने, त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब.
तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या. तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात. शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून निघून जातो. तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
18. घामाचा पैसा
धन्नाशेटचा मुलगा राम खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.' मुलाला काहीच कळेना.
तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला. तिसर्या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली.
पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले.
दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.'
तात्पर्य : स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.
19. गाढवाचा गैरसमज
एकदा, एका पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या. देवाच्या मूर्ती विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला. दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच हात जोडून मूर्तींना नमस्कार करीत.
पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तींना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही. त्याला वाटे जो तो आपल्यालाच नमस्कार करतोय. त्यामुळे स्वत:ला कोणी तरी मोठा समजून गाढव एक पाऊलही पुढे टाकीना. बराच वेळ पाथरवटाच्या लक्षात येईना. गाढव अडलंय का? आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा हातातल्या काठीचा जोरदार फटका गाढवाला हाणत पाथरवटा म्हणाला, ""प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतोय आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतंय. पण मूर्खा, लोक नमस्कार त्या मूर्तींना करताहेत. आता चल नाही तर आणखी मार खाशील.'
तात्पर्य : खोट्या अहंकाराने फजितीची वेळ येते.
20. कष्टाचे फळ
एका गावात एक म्हातारा शेतकरी रहात होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहितच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे. त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांचा संसार कसा चालणार? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलवितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे.
मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांनी सोन्याचा हंडा मिळविण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणले आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले. त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात जावून विकले व त्यांना भरपूर धन मिळाले.
गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडीलांना सांगितला. तेव्हा ते बोलले, ‘मी तुम्हाला याच धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.’
तात्पर्य - कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.
Taatparya sanga na kashtache fal ya ghostital
ReplyDeleteपफेफ
ReplyDeleteहो
ReplyDeleteDevotional and sadhu sant story this story pls.
ReplyDeleteThanks
ReplyDeletePost a Comment