तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो मी मराठी भाषा बोलतेय मराठी निबंध (Essay on autobiography of marathi language), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.
या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "मी मराठी भाषा बोलत आहे" किंवा "मराठी भाषे चे मनोगत" किंवा "मराठी भाषा ची कैफियत" किंवा "मराठी भाषेचे आत्मवृत्त मराठी निबंध".
मी मराठी भाषा बोलतेय निबंध
मी मराठी भाषा बोलतेय ! अवघ्या महाराष्ट्राची मातृभाषा. मराठी माणसाची लाडकी मायबोली ! देववाणी - संस्कृत भाषा ही माझी जननी. संस्कृतातून प्राकृत निर्माण झाली आणि प्राकृतातून मी अबतरले. पण हे परिवर्तन काही आजचे नाही. त्याचप्रमाणे ते 'एका दिवसात झालेले नाही. वर्षानुवर्षे हे परिवर्तन चालू होते. सामान्य जनांच्या बोलीतून मी जन्माला आले.
मंला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. अगदी नवव्या शतकातला शिलालेख श्रवणबेळगोळ येथे आहे. तो माझ्या शब्दांत लिहिलेला आढळतो -' श्री चामुण्डराये करवियेले.' मुकुंदराजाचा ' विवेकसिंधू हा माझा आद्यग्रंथ आहे. माझ्या सुपुत्रांनी वेळोवेळी मला समृद्ध केले. ज्ञानदेव हा माझा लाडका सुपुत्र. त्याने ' कृष्णार्जुनाच्या गोष्टी ' म्हणजे भगवद्गीता मराठीत ' भावार्थदीपिका ' म्हणून आणली.
ज्ञानदेवांनी आग्रह धरला आणि मग माझे भांडार समृद्ध झाले. आज सातशे वर्षांत मला माझ्या सारस्वतांनी खूप घडवले. त्यात कधीही खंड पडला नाही. आजहो ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे माझे साहित्यिक सुपुत्र आहेत. माझे अनेक पुत्र आणि कन्या आज जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत, पण ते मला विसरत नाहीत. ते कुठेही असले, कोणत्याही भाषेत व्यवहार करीत असले, तरी ते आपल्या मायबोलीला विसरत नाहीत. किंबहुना त्या परमुलखात त्यांना आपल्या मायबोलीत बोलणारा कोणी भेटला की खूपच आनंद होतो.
माझ्या शुद्धतेविषयी माझे सुपुत्र नेहमी जागरूक असतात. अगदी शिवाजी राजांनीही स्वराज्यस्थापनेनंतर पहिले काम काय केले असेल ? तर माझे शुद्धीकरण करून माझा शब्दकोश तयार करवून घेतला. आता तर माझा शब्दरत्नाकर अथांग आहे. त्याला कारण माझी सहिष्णुता. मी माझ्या इतर भाषाभगिनींच्या भांडारातील शब्द आवडले तर खुशाल घेते. माझे मूळ ज्या गीर्बाण-वाणीत आहे, तिचा खजिना तर माझ्यासाठी सदैव खुला असतो. १९६० साली माझे स्वतंत्र राज्य झाले, मी राज्यभाषा झाले. सर्व व्यवहार माझ्या माध्यमातून चालू झाला, तेव्हा मी अनेक शब्द या माझ्या महामातेकडून घेतले व आत्मसात केले.
आजकाल अनेकदा माझ्या भवितव्याबद्दलची चिंता व्यक्त केली जाते. माझी अनेक बाळे माझ्यापेक्षा इंग्रजीला जवळची मानतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ती जातात. मग बोलताना ते अनेक भाषांतील शब्द माझ्यात घुसडतात. त्यामुळे माझ्या हितचिंतकांना चिंता वाटते की, मी नामशेष तर होणार नाही ना? माझ्या मते, अशी चिंता करीत बसण्यापेक्षा योग्य दिशेने पावले टाकली पाहिजेत. माझा विकास करायचा असेल, तर मराठीतून शिक्षण घेतले पाहिजे. मराठीतून लेखन-वाचन केले पाहिजे. मराठी ग्रंथ विकत घेऊन वाचले पाहिजेत. सर्व क्षेत्रातील लोकांनी आपले ज्ञानविचार मराठीतून प्रकट केले पाहिजेत. मराठी ज्ञानभाषा बनली पाहिजे. परंतु मराठीचा विकास होण्यासाठी मराठी माणसाचा विकास झाला पाहिजे. मराठी माणसाने विकासासाठी धडपडले पाहिजे, तरच मी म्हणजे मराठी भाषा जिवंत राहील.
पण मित्रांनो, कोणतीही काळजी करू नका. मी कधीच नष्ट होणार नाही. खेडोपाडी पसरलेले माझे लाखो भाषिक मला सदैव जिवंत ठेवतील, कारण मी आहे -
"अमृताशी पैज जिंकणारी !''
मी मराठी भाषा बोलतेय निबंध PDF
मराठी भाषेचे मनोगत निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read
Post a Comment