तुमच्या सर्वां साठी सादर करत आहे एका जीर्ण पुस्तकाची कैफियत मराठी निबंध (Jirna pustakachi atmakatha marathi nibandh). या निबंध चे शीर्षक एका जीर्ण पुस्तकाची आत्मकथा किंवा एका जीर्ण पुस्तकाचे मनोगत पण असू शकते.
सोबत तुम्ही जीर्ण पुस्तकाची कैफियत निबंध PDF आपल्या मोबाइलला मध्ये डाउनलोड पण करू शकता.
जीर्ण पुस्तकाची कैफियत निबंध
आमची चाळ जोर्ण झाली होती. ती पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याची योजना आखण्यात आली होती. साहजिकच आम्हांला अन्य घरात तात्पुरते राहण्यासाठी जाणे भाग पडले होते. सामानाची बांधाबांध करण्यासाठी मी पोटमाळ्यावर वावरत होतो. तेवढ्यात माझे लक्ष एका जुन्या लाकडी पेटाऱ्याकडे गेले. त्याच्यावर पसरलेली धूळ व कोळिष्टके बाजूला सारून मी तो पेटारा उघडला. आत अनेक बोचकी, गाठोडी ठेवलेली होती. त्यांतच काही पुस्तके दाबून खुपसून ठेवली होती. मी कुतूहलाने एक पुस्तक उचलले. तेवढ्यात कण्हत, विव्हळत बोलण्याचा आवाज आला... आणि मी दचकलोच ! पण थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले की, ते पुस्तकच माझ्याशी बोलत होते..
"बाळा, जरा जपून रे ! खूप वेदना होताहेत. मी अगदी जीर्ण झालो आहे; आता मी वार्धक्याचे जिणे जगत आहे. माझी पाने पाहा. कोणत्याही क्षणी फाटतील अशी बनली आहेत. तुम्हां लोकांना पुस्तकांची किंमतच नाही. मला कसे कोंबून ठेवले होते, पाहिलेस ना? अरे, तुझ्या आजोबांना वाचनाची आवड होती. म्हणून त्यांनी मला या घरी आणले. आता आजोबा गेले आणि माझी ही अवस्था झाली ! बाळा, माझे वय झाले आहे, हे खरे आहे; पण तुम्ही जरा काळजी घेतली असती, तर मी आणखी काही वर्षे धडधाकट आयुष्य जगले असते. पण काय करणार !
" हे बघ बाळा, तू तरी लक्ष देऊन ऐक मी काय सांगते ते. मी खूप जुनं पुस्तक आहे. माझी निर्मितीच मुळी सुमारे नव्वद वर्षांपूर्वी झाली. जे कथानक माझ्या पानापानांतून सांगितले आहे, ते जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीचे आहे ! त्यातील माणसे, त्यांचे राग-लोभ-द्वेष, त्यांची आपापसातील भांडणे, हेवेदावे, त्यांचे एकमेकांवरचे प्रेम या सगळ्या भावभावनांचे प्रत्ययकारक दर्शन घडवून मी अनेक वाचकांना विलक्षण आनंद दिला आहे. माझ्यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या काळाचे दर्शन घडते.
त्या वेळची माणसे, त्यांचे खाणेपिणे, त्यांचे कपडेलत्ते, त्यांचे बोलणे, चालचलणूक, त्या वेळच्या रूढी, परंपरा यांचे माझ्यामुळे प्रत्ययकारक दर्शन घडते. मी वाचकाला भूतकाळात फिरवून आणते. भूतकाळाच्या दर्शनामुळे वाचकाला वर्तमानकाळाशी तुलना करता येते. रूढी-परंपरांमधील चांगले-वाईट समजून घेता येते. त्यामुळे आपण वर्तमानकाळात कसे वागावे, याचे मार्गदर्शन मिळते. भविष्याचा वेध घेता येतो. केवढे महान मूल्य माझ्यात आहे ! तरी तुम्ही अलीकडे माझ्याकडे लक्ष देत नाही. नाहीतर मला असे अडगळीत कोंबून ठेवले नसते !
"बरं का बाळा, तुम्हां लोकांची वाचनाची आवडच नष्ट होत चालली आहे. तुम्हांला संगणक, दूरदर्शन हे मनोरंजनाचे नवीन मार्ग सापडले आहेत. त्यांत तुम्ही पूर्ण बुडून गेला आहात. माझ्याबद्दलचे प्रेम नष्ट होण्यामागचे हे एक कारण आहे. म्हणून मी असे अडगळीत पडून जीर्ण झालो आहे.
"मी जीर्ण होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमची पुस्तके झताळण्याची बेदरकार पद्धत. तुम्ही पुस्तकांची अजिबात काळजी घेत नाही. वाटेल तसे डुमडता; माझे कोपरे फाडता, धुळीपासून माझे रक्षण करीत नाही. तुम्ही मला कुठेही, कसेही यकता. मी जीर्ण होणार नाही, तर काय? अलीकडे मी पाहिलेय... तुम्ही लोक घर सजवण्यासाठी हजारो रुपये खर्च करता. पण मला मात्र त्यात स्थान नसते. आता निदान एक करशील का? तू मला वाचनालयाला देणगीदाखल दे. तिथे जुन्या पुस्तकांचे जतन करण्याचे नवनवीन उपाय केले जातात. मग मी अजरामर होईन. माझी ही अंतिम इच्छा पूर्ण करशील का?"
जीर्ण पुस्तकाची कैफियत निबंध PDF
एका जीर्ण पुस्तकाची कैफियत मराठी निबंध PDF ला आपल्या मोबाइलला मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read
महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मनोगत
Post a Comment