जीवनातील विनोदाचे स्थान निबंध मराठी | Jivanatil Vinodache Sthan Marathi Nibandh
तुम्हा सर्वान साठी जीवनातील विनोदाचे महत्त्व मराठी निबंध लिहिला आहे (Jivanatil Vinodache Sthan Marathi Nibandh). तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल.
जीवनातील विनोदाचे स्थान निबंध मराठी
"विनोद हा जीवनातील असंख्य दुःखांवरचा जालीम इलाज आहे '', “' विनोद ही साहित्यातील अहिंसा आहे, '' असे आचार्य अत्रे म्हणत. अगदी सहजगत्या हसत हसत विनोदाच्या साहाय्याने इतरांच्या दोषांवर बोट ठेवता येते. मराठीतील अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यात विनोदाचा असा मार्मिक उपयोग केला आहे. राम नगरकर, मंगला गोडबोले , मुकुद टाकसाळे, रामदास फुटाणे, अशोक नायगावकर यांसारख्या अलीकडच्या अनेक लेखक-कवींनी विनोदाचे दालन समृद्ध केले आहे.
अनेकदा विनोदाच्या मदतीने जीवनातील दुःखाची तीव्रता कमी करता येते. सुप्रसिद्ध विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांनी रेखाटलेल्या 'व्यक््ती आणि वल्ली' या व्यक््तिचित्रांतील अनेक व्यक्ती आपल्या दुःखांना विनोदाचे अवगुंठन घालून त्यांची तीव्रता कमी करतात. या व्यक्तिरेखांतून 'विनोद आणि कारुण्य' यांचा मनोज्ञ संगम पाहून वाचकाची अवस्था ' ओठावर हसू आणि डोळ्यांत आसू' अशी होते. म्हणूनच कुणा समीक्षकाने विनोदाला ' वाळवंटातील हिरवळ' म्हटले आहे. विनोदाच्या गुलाबपाण्याचा शिडकावा मन प्रसन्न करतो.
बालकांच्या निरागस जीवनात विनोदाला व हास्याला आगळे स्थान असते. म्हणून तर सर्कशीतील विदूषकांच्या नुसत्या हातवाऱ्यांनीही ती खुदूखुदू हसू लागतात आणि विदूषकांच्या “मर्कटलीला' सुरू झाल्या म्हणजे तर त्यांचा आनंद अगदी उतू जातो ! टॉम व जेरी यांच्या माकडचेष्टा त्यांना हसून हसून लोळायला लावतात. अशा वेळी स्वत:ला “प्रौढ व मोठ्ठी ' समजणाऱ्या माणसांनाही हसू आवरत नाही. जीवन सुसह्य होण्यासाठी खेळकरपणा अत्यंत आवश्यक असतो , हैच येथे दिसून येते.
राम गणेश गडकरी यांनी 'बाळकराम' बनून समाजातील दांभिक प्रवत्तीला आपल्या विनोदी लेखातून रेशमी चिमटे काढले. त्यासाठी त्यांनी ' कवींचा कारखाना ' उघडला; ' ठकीच्या लग्ना 'ची मोहीम उघडली , तर गृहिणींना ' मौलिक पदार्थांची पाककृती ' शिकवली. ' बेबीज डे आऊट', 'हेराफेरी', 'वेलकम', 'चाची ४२०' यांसारख्या चित्रपटांनी मनमुराद हसवता हसवता ' मानवी अपप्रवृत्तींवर हल्लासुद्धा केला आहे. येथे विनोद हे सामाजिक प्रबोधनाचे किती प्रभावी साधन आहे, हे स्पष्ट होते. तेच काम श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी ' सुदाम्याचे पोहे' लिहून केले. सदा हसणारी व दुसऱ्यांना हसवणारी माणसे सर्वांना हवीहवीशी वाटतात, हेच जीवनातील विनोदाचे महत्त्व आहे.
Read
लोकसंख्या वाढ एक समस्या मराठी निबंध
Post a Comment