निसर्गाचा प्रकोप एक महाभयंकर संकट मराठी निबंध | Nisargacha Prakop Essay In Marathi

तुम्हा सर्वान साठी निसर्गाचा प्रकोप एक महाभयंकर संकट मराठी निबंध लिहिला आहे (Nisargacha Prakop Essay In Marathi). तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल. (Essay On Nature In Marathi)

Essay On Nature In Marathi

निसर्गाचा प्रकोप एक महाभयंकर संकट मराठी निबंध

मानव हे निसर्गाचे अपत्य आहे. पण आजवर माणसाने अनेकदा निसर्गावर मात करण्याचा उन्मत्तपणा केला. ज्या ज्या वेळी कुऱ्हाडीचा हा दांडा गोतास काळ होऊ लागला, त्या त्या वेळी रुष्ट झालेल्या निसर्गाने माणसाला आपले रौद्ररूप दाखवले.

माणसाने घरांसाठी, जळणासाठी प्रचंड जंगलतोड केली. हिरवीगार झाडे तोडून माणसाने निसर्गाचे अंतःकरणच दुखावले. माणसाला मिळणारी सावली नष्ट झाली, उन्हाचे प्रमाण वाढले आणि अवर्षणाच्या रूपाने निसर्गाने आपला प्रकोप व्यक्‍त केला. झाडे तोडली गेल्यामुळे मातीची धूप वाढली. सुपीक जमीन रेताड बनू लागली. निसर्गाचा हा संताप माणसाने जाणला नाही. नद्यांच्या रूपाने मिळालेले पाणी माणूस दूषित करू लागला. औद्योगिक प्रगतीचा उन्माद माणसाला चढला. हवा दूषित ! पाणी दूषित ! सर्वत्र ध्वनिप्रदूषण ! त्यामुळे उन्मत्त माणसाला संतप्त निसर्गाने धडा शिकवण्याचे योजले. नाना साथी, नाना आजार यांनी माणूस संत्रस्त झाला.

जेव्हा शहरांच्या विकासासाठी माणूस समुद्राला मागे ढकलू लागला, तेव्हा समुद्र खवळला. मागे लोटलेला सागर दुसऱ्या किनाऱ्यावर आक्रमण करू लागला. एका बाजूला माणसाला समुद्राच्या अथांगतेचा केवढा आदर आहे ! पण कृतघ्न माणूस आपला सारा केरकचरा समुद्रात टाकतो. मग खवळलेला सागर ओहोटीच्या मिषाने माणसाचा सारा कचरा त्याला परत देतो. हा रत्नाकर खवळला की, वेळोवेळी भीषण वादळाचा तडाखा देऊंन आपला राग व्यक्‍त करीत असतो.

धरणी ही निसर्गाचे एक महान रूप आहे ! आपल्या सर्जकतेने ती माणसाच्या जिभेचे चोचले पुरवते. पण हीच धरणी कधीतरी कोपते आणि मग धरणीकंप होतो. पाहता पाहता नांदणारी गावे नष्ट होतात. अमाप मनुष्यहानी होते. किल्लारी येथे. झालेल्या भूकंपात माणसाने निसर्गाचा हा प्रकोप अनुभवला; तर अलीकडेच मुंबईत व महाराष्ट्रात महापुराने महाभयानक तांडवनृत्य केले. पण अनुभवाने शहाणा होईल, तर तो माणूस कसला ? अनेक ठिकाणी ज्वालामुखी पर्वत आपला शिलारस  आसमंतात पसरवतात आणि चराचराला पोळून काढतात. 

निसर्गाचा असा प्रकोप अनुभवून तरी माणूस शहाणा झाला आहे का? नाही. माणूस आपल्या अविचाराने निसर्गाला सतत डिवचत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवत आहे. माणसाच्या या अविचारामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. वृक्षांच्या अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. पशुपक्ष्यांच्या अनेक जाती दुर्मीळ होत आहेत. पृथ्वीवरील आवरणाचा संरक्षक पडदा फाटला आहे. आपली नतद्रष्ट कृत्ये माणसाने थांबवली नाहीत, तर एखाद्या वेळेस निसर्गाचा प्रकोप एवढा होईल की, मानवजात त्या प्रकोपात नष्ट होईल, पृथ्वीच रसातळाला जाईल, अशी भीती वाटते.

Read

सागराचे मनोगत मराठी निबंध

वादळग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

भ्रूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

झाडांवर मराठी निबंध

पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post