Sai Baba Stories In Marathi | साई बाबांच्या कथा मराठीत | साई बाबा मराठी गोष्टी 

शिरडतले साई बाबा हे खूप मोठे संत होते आणि लोक त्यांना खूप मानायचे आणि आताही मानतात. साई बाबा च्या खूप सारा कथा प्रचलित आहे त्यांमधून हे काही साई बाबांच्या मराठी कथा (Sai Baba Stories In Marathi) आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो अहो. 

Sai Baba Stories In Marathi

आशा कात्रो तुम्हाला ह्या साई बाबांच्या कथा खूप आवडेल.

Contents


1. प्राणीमात्रांवर प्रेम करा

shree sai baba stories

एके दिवशी नदीच्या बाजूला काही मुले खेळत होती. त्यातील एका साबू नावाच्या मुलाला एक छोटस व गुबगुबीत असे सशाचं पिल्लू दिसल. ते बघून साबु ओरडला, “अरे वा, पिल्लू” ते ऐकल्यावर गब्बू, ठब्बू, मोनू, सोनू, राधू असे सर्वजण खेळता खेळता थांबले व त्यांनी आपल्या नजरा चहुबाजूंनी फिरवल्या.

एकदम एवढया सगळया मुलांना पाहून ते सशाचे पिल्लू खूपच घाबरले व ते लपण्यासाठी एका झुडपात घूसले. हे साबूने पाहिले होते. म्हणून साबू लगेच तिकडे पळत गेला. ते बघून सर्वच मुल त्याच्या पाठोपाठ गेली. ते पिल्लू घाबरलेल बघून त्या मुलांनी हातात एक लाकडी काठी हातात धरून ते सर्वजण त्या गुबगुबीत पिल्लाला काठीने टोचू लागले.

टोचल्यामुळे त्या बिचाऱ्या पिल्लाला त्रास होत होता, परंतु त्याला बोलता येत नव्हते की ओरडता येत नव्हते. ते स्वतःच्या बिळाचा रस्ता चुकले होते व त्याची शिक्षा ते भोगत होते. निमूटपणे काटयाच्या टोचण्या सहन करत होते.

एवढयात तेथे नदीवर स्नानासाठी साईबाबा आले. त्यांनी बघितले की, झुडूपाजवळ सर्व मुले काटक्याने एका छोटया पिलाला टोचत होती व ते पिल्लू बिचारे घायाळ अवस्थेत पडले होते.

बाबांना त्या पिल्लाची खूप दया आली. त्यांनी आपल्या हातातील कपडे व लोटा पटकन रेतीच्या ढीगाऱ्यावर फेकला. 

ते पळतच मुलांकडे गेले व म्हणाले, “अरे बाळांनो हे काय करता आहात? त्या गरीब प्राण्याला का त्रास देत आहात. तुमच्या हातातील या काटक्या तुम्ही मला टोचा, पण त्या लहान पिल्लाला टोचू नका. आणि जर मला टोचावेसे वाटत नसेल तर तुमच्यापैकी एकाला कोणाला तरी टोचा. मी देखील तुम्हाला टोचू लागतो.”

ते ऐकून मुलांना फारच लाज वाटली व त्यांनी सर्वांनी बाबांची क्षमा मागितली. ती बाबांना म्हणाली, “बाबा, आम्हाला माफ करा यापुढे आम्ही असा खोडकरपणा कधीही करणार नाही.”

बाबांनी त्यांना सांगितले की, ‘ठिक आहे, परंतु मुलांनो इथून पुढे कधीही कोणत्याही प्राण्यांना त्रास देऊ नका. ते आपल्याला कधीही त्रास देत नाही. म्हणून आपण देखील प्राण्यांवर दया करायला पाहिजे. प्राणी संपत्तीचे रक्षण करा. प्राण्यांचे रक्षण करणे हेच आपले कर्तव्य आहे.

यातून आपल्याला एक बोध होतो, आपण बघतो आहोत की, देशातील वाघ, सिंह, चित्ते या सारखे प्राणी आता नष्ट होत चालले आहेत. जर आपण प्राण्यांना मारत राहिलो तर भविष्यात आपल्याला प्राणी अजिबात बघायला मिळणार नाहीत. 

साईबाबांनी शेवटी मुलांना सांगितले, “आपण सर्वांनी एकच नारा केला पाहिजे, प्राण्यांचे संरक्षण करा! प्राण्यांचे संरक्षण करा.”

Read लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids With Moral | छान छान गोष्टी

2. सत्कृत्य

sakrutya marathi story

पावसाळयाचे दिवस होते. पूर्वीच्या काळी मुलांच्या वरच्या वर्गाच्या शाळा या शहरातच होत्या, त्यामुळे शाळेतील मुलं ही शहराकडील शाळेत पायीच चालत जात असे. तेव्हा रस्ते व बस नव्हत्या. जाण्यायेण्याचे काही साधन नव्हते. 

शिर्डी हे छोटस गाव होत व कोपरगाव हे शहर होतं. जेव्हा खेडयातील मुल पाऊस जोरात असताना शाळेत जात तेव्हा त्यांना चिखलातून जावे लागत असे. त्यांच्या पायात चप्पल किंवा बुट नसायचे. नदीला जर पुर आला तर ही मुले अडकून बसायची. पूर कमी झाला नाही तर चार चार दिवस त्यांची शाळा बुडायची. अतिशय चिखलामुळे व पाण्यामुळे त्यांना रस्ता दिसत नसे. चालताना मुले चिखलात फसायची, पाण्यात बुडायची. मुलं शाळेतून घरी येईपर्यंत त्यांच्या आई-वडीलांना अतिशय काळजी वाटत असे. परंतु मुलांना शाळेत जायला खूप आवडायचे. पावसात सुध्दा ते शाळेत जात असे. ती मुल एकमेकांना सोडत नसे. एकमेकांना धरून राहत असत. एकमेकांना मदत करत असे. त्यांच्याजवळ असलेली शिदोरी ते एकमेकांना वाटून एकत्र खात असत. ही त्यांची फार चांगली सवय होती.

एके दिवशी रस्त्याच्या कडेला एक गाय हिरव गवत खाण्यासाठी धावत गेली व तेथील चिखलात तिचे पाय अडकले ते तिला चिखलाबाहेर काढता येत नव्हते. तेव्हा शाळेतील हि पाच सहा मुले शाळेत जात होती. त्यांना ती गाय दिसली. एका मुलाच्या लक्षात आले की, ही गाय चारा खायला आली व तेथेच चिखलात अडकली आहे. म्हणून त्याने सर्व मुलांना हे सांगितले.

सर्वांनी आपली दप्तरं बाजूला ठेवली व त्या गाईजवळ गेले. त्यांना तिला त्या चिखलातून काही केल्या ओढता येईना. तेव्हा त्यांनी शेतीतील एक लांब बाभळीचे लाकुड उचलून आणले. ते तिच्या पोटाखाली पुढच्या पायाजवळ दिले. दोन्ही बाजूला दोन-दोन, तीन-तीन मुले झाली, व एक जुटीने उचलू लागली तरी त्यांची शक्ती कमी पडत होती. खूप प्रयत्न केल्यानंतर ती मुले थकून गेली. परंतु त्या गाईला त्यांना सोडून जावेसे वाटत नव्हते. त्यांच्या मनातील हे दुःख बाबांना समजले. बाबा लगेच त्यांच्याजवळ गेले व आपल्या भक्तांना त्यांनी सांगितले, “तुम्ही थोडया वेळ थांबा मी येतो आहे.” बाबा घाईने चाललेले बघून त्याचे सारे भक्तही त्यांच्या पाठोपाठ गेले. बाबांना व त्यांच्या भक्तांना पाहून मुलांना फारच आनंद झाला. बाबांनी व त्यांच्या भक्तांनी मुलांना मदत केली व त्या गाईला चिखलातून बाहेर काढले. मुलांना अतिशय आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. 

बाबांनी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून त्यांना आर्शीवाद दिला, “मुलांनो, तुम्ही किती दयाळू आहात. तुम्ही त्या गाईला वाचवण्याचा प्रयत्न केलात. प्राण्याविषयी दया ठेवणे हे अतिशय चांगले लक्षण आहे. प्रत्येकाने दररोज असे एक सत्कृत्य केले पाहीजे. तुम्ही आज हे एक सत्कृत्य केले आहे. जो सत्कृत्य करतो, त्याच्या पाठीमागे नेहमी परमेश्वर असतो, त्याला मदत करतो.”

मुले बाबांना म्हणाली, “बाबा, तुम्हीच आम्हाला सांगितले होते प्राणी मात्रावर दया करा.”

बाबांना त्यांना उदी लावली व म्हणाले, “पोरांनो खुप शिका, व मोठे व्हा.”

मुलेही बाबांचे भक्त बनले.

मुलांनो या कथेतून आपण असा बोध घेतो की, “आपण दररोज एखादे तरी चांगले काम केले पाहिजे.” 

हल्ली आपण बघतो सर्वांच्या अंगात आळस भरलेला दिसतो. कोणाच्या उगीचच उपयोगी पडणे कोणाला आवडत नाही. आजकालची मुले देखील कोणाचे काम ऐकत नाही. कोणी काम सांगितले की टाळाटाळ करतात. तर हे अतिशय चुकीचे आहे.

म्हणून बाबांनी आपल्याला संदेश दिला आहे की, कमीत कमी दिवसाकाठी एखाद्याच्या तरी उपयोगाला पडा व मदत करा.

Read अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi

3. साईबाबांचे ज्ञानाचे महत्व

sai baba marathi katah

एके दिवशी नित्यनियमाप्रमाणे बाबा पाच घरी भिक्षा मागून येत होते, तेव्हा त्यांना रस्त्यात काही मुले गोटया खेळताना दिसली. त्यातील तीन मुले शाळा सोडून आली होती व दोन मुले शाळेतच गेली नव्हती. 

एक मुलगा दुसऱ्या मुलाला म्हणाला, “मी तुझ्या बाबांना सांगणार आहे, तू शाळेत गेला नाहीस म्हणून. “ते ऐकून तो मुलगा जोरात ओरडू लागला. त्यांचा आरडा ओरडा बाबांनी ऐकला व बाबांच्या लक्षात आले की, शाळेची वेळ असून सुध्दा मुलं शाळा सोडून खेळत आहेत. हे अगदी चुकीच आहे. जर यांना शाळा सोडून खेळायची सवय लागली तर ही सर्व मुल शाळा सोडून देतील. आपण त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. बाबांनी जवळ जाऊन मुलांना विचारले, “कोण कोण शाळा बुडवुन गोटया खेळणारे आहात?” ती मुल बिचारी घाबरली व बाबांसमोर उभी राहीली. पूर्वीच्या काळी मुल गुरूजींना व इतर मोठया माणसांना घाबरत असत. गुरूजींना सांगतो असे म्हटले की ते खूप घाबरत असत. अशी भीती त्यांना होती म्हणून त्यांनी बाबांची माफी मागितली.

तेव्हा बाबा त्या मुलांना म्हणाले, “मुलांनो शाळा कधीही बुडवू नये. कारण शाळा हे एक ज्ञान मंदीर आहे. जर तुम्ही शाळेत गेले नाही तर तुम्हाला ज्ञान कसे मिळणार? आपला विकास शाळेतून होतो म्हणून शाळा हे एक विकासाचे केंद्र आहे. म्हणून तुम्ही कोणीही यापुढे शाळा बुडवू नका.”

त्या मुलांच्या समोर बाबांचा उपदेश होता म्हणून ती मुले रोज शाळेत जात होती. आणि बाबांचा हा उपदेश इतरांना देत होती. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात वाढ होत होती. मुलांच्या पाठीवर बाबांचे हात पडत होते व मुलांची प्रगती होत होती.

जी मुल खूप लहान होती ती मुल शाळेतून आल्यावर बाबा त्यांना विचारत असे, “तू शाळेत गेला होतास ना! ” मुलगा ‘हो’ म्हणायचा. तेव्हा बाबा त्याला शाबासकी देत. बाबा तेव्हा मुलांना आपल्याजवळील खाऊ देत. त्यामुळे बाबा सर्वांना फार आवडायचे. बाबांमध्ये व मुलांमध्ये अतिशय जवळीकतेच नात निर्माण होत असे. बाबा म्हणत ‘मुलांना शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे.’

या कथेतून आपल्याला असे कळते की, शाळा हे संस्काराच व मुलांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. या केंद्रावर कोणत्याही प्रकारचा व्यापार होत नाही किंवा कोणताही भ्रष्टाचार होत नाही. येथे विनामूल्य माणसं चांगली व सुसंस्कृत बनली जातात. म्हणून या शाळेला एक ज्ञान मंदिर म्हटले जाते.

Read तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi

4. एकत्वाची जाणीव

ekatva chi janiv

"रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सर्व मुल खेळण्यासाठी जमा झाली होती. ते आपापल्या वयानुसार खेळ खेळू लागले. मुलांनी गल चेंडूचा खेळ खेळायला सुरूवात केली. हा खेळ सोपा होता. सर्व मुलांच्या गली एकाजवळ एक होत्या. मुलांनी आपापल्या गलित ठराविक अंतरावर चेंडू टाकायचा. चेंडू ज्याच्या गलित जाईल तो मुलगा पाठीवर येऊन बसायचा, व “कुरघोडी कर” असे म्हणायचा. चेंडू दूसऱ्याच्या गलित गेला की तो त्याला उतरून “उत्तर भाई घोडी देदो इधर” म्हणून उडी मारून त्याच्या पाठीवर बसायचा व म्हणायचा “कुरघोडी कुर” अशा प्रकारे हा क्रम चालूच असायचा. 

हा खेळ मुलांचा अतिशय आवडता खेळ होता. तो खेळ चालू होता, तेव्हा त्यात एका गरीब मुलाला घेतले नव्हते. त्याची बिचाऱ्याची खेळण्याची खूप इच्छा होती. त्याचवेळेस बाबा भिक्षा मागण्यासाठी तेथून चालले होते. तो मुलगा लगेच बाबांजवळ जाऊन म्हणाला, “बाबा, मला सुध्दा खेळायचे आहे, पण ती मुल मला खेळात घेत नाहीत.” तेव्हा साईबाबा म्हणाले, “तुला ती मुल खेळात का घेत नाहीत?”

मुलगा त्यांना म्हणाला, “मी व माझे आई वडील गरीब आहोत म्हणून ते सर्वजण मला कमी समजत आहेत, तुम्ही त्यांना समजावून सांगितले तर ते मला खेळायला घेतील.” 

त्यानंतर बाबांनी त्या मुलांना विचारले, “काय रे बाळांनो तुम्ही या मुलाला खेळात का घेतले नाही.” 

तेव्हा एका मुलाने सांगितले, “बाबा, आम्ही सर्व श्रीमंताची मूल आहोत व तो गरीब आहे. आमच्या आई-वडीलांना सांगितले की, नेहमी श्रीमंताशी मैत्री करावी. मोठयांबरोबर रहावे. गरीबाला गुण नसतात. म्हणून आम्ही त्याला खेळायला घेत नाही.”

बाबांनी इतर मुलांना विचारले की, हे खरे आहे काय? मुलांनी त्यांना होय म्हणून सांगितले. तेव्हा बाबा त्या मुलांला म्हणाले, “तुम्ही चुकीचे वागत आहात. लक्षात ठेवा, गरीबी ही कायम नसते आणि श्रीमंती टिकून राहत नाही. असा भेदभाव आपण करू नये. कोणीही माणूस उच्च व निच नसतो. सर्वजण सारखे असतात. असे संतांनी सांगितले आहे.”

मुलांना बाबांचे म्हणणे पटले. त्यांनी बाबांचे म्हणणे ऐकले. बाबांनी त्यांना ‘आम्ही सारे एकच आहोत’ असे म्हणायला सांगितले.

बाबांनी सर्व मुलांना प्रेमाने जवळ घेतले व प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला व आर्शिवाद दिला. बाबा मनातल्या मनात म्हणाले, ‘मुले मनाने किती मोकळे असतात. त्यांच्यावर संस्कार करणारी माणसं ही वाईट संस्कार करतात.’

बाबा मुलांना म्हणाले, “आता तुम्ही सारे मिळून खेळणार, असा भेद कधीही करणार नाही. मी आता भिक्षा मागायला जातो. मुलांनी बाबांना विचारले, “आम्हाला तुम्ही रोज गोष्ट सांगणार ना?” त्यावर बाबा म्हणाले, “हो मी तुम्हाला छान छान गोष्टी सांगणार आहे. पण मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात आहे ना!”

मुले उत्तरली, “होय, आम्ही सारे एकच आहोत.”

यातून आपल्याला असा बोध होतो की, आपल्या देशात अनेक मतभेद, जातीभेद, धर्मभेद, व्यक्तीभेद असे भेद आहेत, परंतु हे भेद न मानता आपण सर्वांनी एक म्हणून रहावे व वागावे.

Read Mahabharat Stories in Marathi | महाभारत कथा मराठीत

5. मोठे स्वप्न

mothe swapn sai baba story

एका गावात गीताबाई नावाची बाई रहात होती. तिला एक मुलगा होता. तो मुलगा रात्री झोपेत दचकून उठायचा, रडायचा आणि वेडयासारखा हसायचा. कधी कधी तर तो झोपेतून उठून बाहेर चालायचा.

गीताबाईने त्याला तिला माहित असलेल्या जाणत्याला दाखविले, गंडा दोरा घातला. भुतबाधा असेल तर वैद्याला दाखविले. परंतु काहीच फरक पडत नव्हता. तो मुलगा दिवसभर खूप चांगला असायचा, पण रात्री मात्र तो बैचेन व्हायचा. गीताबाई रात्रभर जागी रहायची. कारण तिला भीती वाटत असे की, जर तो उठून वाटेवर गेला तर, एखाद्या विहिरीत वगैरे पडला तर! विशेष म्हणजे त्यांच्या वाडयाच्या अंगणात आड होता. म्हणून गीताबाईला रात्री अजिबात झोप येत नसे. ती प्रत्येकाला मुलाबद्दल सांगायची. तिला वाटत असे की, आपल्या मनातील दुःख जर आपण सांगितले तर त्यावर कोणीतरी तिला काही इलाज सांगेल.

तिने एक दिवस ही गोष्ट तिच्या शेजारच्या बाईला सांगितली. तेव्हा सईबाई तिला म्हणाली, “गीता, तुझ्या मुलाला शिर्डीला घेऊन जा. तिथे एक बाबा आहेत, त्यांना साईबाबा असे म्हणतात. त्यांचा खूप गुण येतो. आपल्या शेजारच्या दोन बायकांना त्यांचा गुण चांगला आला आहे. तू उदया तेथे जा कारण उदया गुरूवार आहे. बरेच लोक गुरूवारी येतात.” 

तेव्हा गीताबाई म्हणाली, “होय, मी उदयाच मुलाला बरोबर घेऊन जाते.”

गीताबाई दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या बरोबर शिदोरी घेऊन शिर्डीला निघाली. भर दुपारी गीताबाई, तिचा नवरा व मुलगा यांना घेऊन तिथे पोहोचली. तेव्हा बाबा झाडाखाली बसले होते. तिला पाहून बाबांनी विचारले, “बोल माय, कस येण केल? कोणत्या गावातून आलात? बसा, पाणी प्या, भर उन्हातच आला आहात.” 

बाबांनी त्यांना ग्लास भरून पाणी दिले. तेव्हा गीता त्यांना म्हणाली, “तुम्ही बसा बाबा, आम्ही आमच्या हाताने पाणी घेतो.” 

त्यावर बाबा तिला म्हणाले, “ते माझे कामच आहे. माझ्या झोपडीत तुम्ही आलात. तर मला तुमची सेवा ही करायलाच पाहिजे.”

सर्वांनी पाणी पिल्यावर बाबांनी त्यांना विचारले, “काय झाले आता सांगा!” गीताने बाबांना सांगितले की, “आमचा मुलगा हा अर्जुन, दिवसभर चांगला असतो. पण रात्री त्याला झोपच नसते. त्याला कसले कसले स्वप्न पडतात. गावातील सगळया वैद्याला दाखविले परंतु काहीच गुण आला नाही.”

मग बाबांनी त्या मुलाला विचारले, “काय रे बाळा, तू शाळेला जातो का? शेती काम करतो का?” अर्जुन त्यांना म्हणाला, “मी शाळेत जातो बाबा.” बाबा म्हणाले, खर तर शाळेतल्या मुलांना स्वप्न कसे पडतात?” बाबांनी त्याला उदी लावली व डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवला व मंत्र म्हटले. बाबा त्याला म्हणाले, “जा बाळा आता, तुला स्वप्न पडणार नाहीत. पण लक्षात ठेव, मुलांनी स्वप्न पाहिले पाहिजे, आणि ती स्वप्न मोठी असली पाहिजे.”

बाबांनी अर्जुनला केलेला हा संदेश अतिशय महत्वाचा आहे. तो प्रत्येक घरात जाणे आवश्यक आहे.

Read भुतांच्या गोष्टी | Horror Stories in Marathi | Ghost Stories in Marathi

6. चोरी करणे वाईट

chori karne vait

एकदा दुपारी ऊन खूप तापलेल होत. गुराखी आपली जनावर घेऊन झाडाखाली विश्रांती घेत होते. पशु-पक्षी झाडावर सावलीत बसली होती.

तेवढयात काही उनाड मुल एका पेरूच्या व संत्रीच्या बागेत शिरली. त्या सर्व मुलांनी तेथील रखवालदाराची नजर चुकवून पेरू व संत्री तोडले. काहींनी खिसे भरून घेतले, तर काहींनी डोक्यावरच्या रूमालात बांधून घेतले. आणि ते सर्वजण बागेबाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी सर्वांनी पोटभर पेरू व संत्रे खाल्ले. ती मुल फिरत ज्याठिकाणी बाबा बसले होते तेथे आली. बाबा तेथे चिंतन करत बसले होते. चिंतन संपवून डोळे उघडल्यावर बाबांना समोर मुलांचा घोळका दिसला. बाबांच्या लगेच लक्षात आले की, ‘हया मुलांनी रखवालदाराच्या नकळत पेरू व संत्री आणली आहेत.’

बाबांनी त्यांना विचारले, “काय रे बाळांनो, तुम्ही काय आणले आहे. आंबे खाता आहात काय?” ते ऐकून मुलांना आनंद वाटला. त्यांनी बाबांना धीटपणे सांगितले, “बाबा, हे आंबे नाहीत. आम्ही पेरू व संत्री आणले आहे, त्या बागेतून.”

एक मुलगा संत्री बाबांच्या पुढे करून म्हणाला, “बाबा, आपण खाणार का?”

बाबा त्याला म्हणाले, “का नाही खाणार? मी खाणार आहे, परंतु ते चोरून आणलेले नसतील तर” ते ऐकून मुल एकदम शांत झाली. कोणीही काही बोलल नाही. बाबा त्यांना म्हणाले, तुम्ही काही बोलत नाही, म्हणजे खरोखरच तुम्ही हे चोरून आणले आहे.” 

त्याबरोबर सर्व मुल खालच्या आवाजात म्हणाली, “होय बाबा, आम्ही हे सारे चोरून आणले आहे.” बाबा त्यांना म्हणाले, “ठिक आहे, म्हणजे तुमची चूक तुम्हाला कळाली आहे. हे खूप आहे. तुम्ही माझ ऐकाल का?”

मुल म्हणाली, “बाबा आम्ही तुमचे ऐकू.” 

तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, “ठीक आहे. तुम्ही आता त्या बागेतील रखवालदाराकडे जा, व त्याला सांगा की, आम्ही तुमच्या बागेतून हि फळे चोरलेली आहेत. त्याची माफी मागा व यापुढे आम्ही कधीही असे करणार नाही, असे सांगा.” 

मुलांनी बाबांना हो सांगितले व ती लगेचच बागेत जाऊन रखवालदारच्या समोर उभी राहिली. व त्यातील एक मुलगा म्हणाला, “मामा आम्हाला माफ करा, आम्ही तुमची नजर चुकवून दूपारी संत्री व पेरू तोडून नेली. यापुढे आम्ही असे करणार नाही. आमची चूक झाली आहे. बाबांमुळे आमचे डोळे उघडले आहे. म्हणून ही फळे आम्ही तुम्हाला परत करत आहोत.” 

रखवालदाराने मुलांना विचारले, “बाबांनी तुम्हाला असा कोणता शब्द वापरला आहे.” 

मुल म्हणाली, “आम्ही चोरी करणार नाही.” 

तेव्हा रखवालदार मामा म्हणाले, “ठिक आहे. तुमचा प्रामाणिकपणा पाहून मी तुम्हाला ही सर्व फळे भेट देत आहे. तुम्ही ती घ्या. परत कधी तुम्हाला फळे खायची इच्छा झाली तर माझ्या समोर तोडून खा.” ते ऐकून मुलांना खूप आनंद झाला. ती बाबांकडे गेली व म्हणाली, “बाबा, आम्ही त्यांची माफी मागितली तेव्हा त्यांनी आम्हाला माफ केले. व ती फळे परत आम्हाला दिली. आता ती तुम्ही खाणार ना!” बाबांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. नंतर सर्वजण एकत्र बसून बाबांबरोबर फळ खाऊ लागली. खातना बाबा त्यांना म्हणाले, लक्षात ठेवा मुलांनो, कधीही चोरी करून नये. माणसाने नेहमी आपल्या कष्टाचे खावे. चोरीच धन घेऊ नये, चोरीच अन्न खाऊ नये, आणि कधी चोरी पचवू नये.”

यातून आपण असा बोध घ्यावा की, “कोणीही कधीही कोणाला फसवू नये आणि चोरी करू नये.

Read Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये

7. काशीरामची भक्ती

kashiram chi bhakti

गावात एक काशीराम नावाचे साईबाबांचे भक्त होते. ते बाबांचे नित्य नियमाने दर्शन घेत असे. 

काशीरामला कधी व्यवसायात यश द्या असे म्हणावे लागले नाही. बाबांच्या वरील निस्सिम भक्तीमुळे काशीरामला यश मिळत होते. पंचक्रोशीत काशीराम हा एक चांगला व्यापारी म्हणून ओळखला जात असे. काशीरामजवळ नेहमी पैसे असायचे. त्याकाळात आजसारखी वाहने नव्हती, त्यामुळे कित्येक वेळा बाजार उरकुन पायी यावे लागत असे. तेव्हा रस्त्यात चोरी करून चोर कित्येक माणसांना आडरानात भेटला की मारून बळजबरीने त्याच्याकडील सर्व ऐवज घेत असत. काशीरामच्या ख्यातीवरून चोरांना माहित झाले होते की, काशीरामजवळ बरेच पैसे असतात. एकदा काशीराम बाजार उरकून पायी जात होता. त्याला वाटेत चोरांनी अडविले. चोरांनी काशीरामला काठयांनी खूप मारायला सुरूवात केली. त्या चार चोरांपुढे त्या एकटयाचे काय चालणार होते. तरीदेखील काशीरामने साईबाबांचा धावा केला. 

शिर्डीत बाबा धुनीजवळ बसले होते. हा प्रकार बाबांना तेथे समजला. बसल्या बसल्या बाबांनी काशीरामला बळ दिले. त्या बळामुळे काशीरामने त्या चार चोरांना मारून मारून पळवून लावले. त्याला रात्री उशीर झाला होता, तरीदेखील तो प्रथम बाबांचे दर्शन घ्यायला गेला. 

त्याला पहाताच बाबांनी विचारले, “काशीराम खूप लागले का? त्यांनी तुझे काही चोरले तर नाही ना” ते ऐकल्यावर काशीरामच्या लक्षात आले की, ‘आपल्या अंगात जे बळ आले ते सर्व बाबांच्या कृपेमुळे आहे.’ त्याने लगेच बाबांचे पाय धरले. बाबांनी लगेच त्याला उदी लावली व आर्शिवाद दिला.

म्हणून, प्रत्येकाच्या संकटकाळी बाबा मदत करतात. जे साईभक्त असतात, त्यांच्यावर त्यांचे विशेष लक्ष असते.

Read Shivaji Maharaj Stories In Marathi | शिवाजी महाराज कथा 

8.  लोहाराचे बाळ

Lohar che baad

शिर्डीमध्ये एका खेडेगावात एक लोहार रहात असे. तो गावातील शेतकऱ्यांचे शेतीचे लोखंडी अवजारे बनवून किंवा दुरूस्त करून देत असे. तो लोकांनी दिलेल्या धान्यावर त्याचा उदरनिर्वाह करत असे. 

तो लोहार शिर्डीच्या साईबाबांचा भक्त होता. तो वेळ काढून शिर्डीला जात व बाबांची भेट घ्यायचा.
जून महिना होता. रविवारचा दिवस होता. त्यादिवशी लोहारकडे कामाची खूप गर्दी होती. लोकांची पेरणी चालू असल्यामुळे लोहाराचे काम संपत नव्हते. लोहाराला एक लहान बाळ होत. घरी त्या बाळाला सांभाळायला कोणी नव्हते. लोहारची पत्नी तेथे बसून भाता फूंकत होती. तिच्या कडेवर लहान बाळ होत. त्या बाळाने आईची नजर चुकविली व ते भट्टीच्या जवळ आले. कामाच्या घाईमुळे लोहारचे देखील लक्ष नव्हते. अचानक बाळ त्याच्या लोह वितळणाऱ्या भट्टीत पडले. ते बघून व्याकुळतेने लोहारची पत्नी ओरडली, “बाबा”तेव्हा बाबा धूनी जवळ बसले होते. त्यांना दिसले की, बाळ भट्टीत पडले आहे. ते बघताच बाबांनी त्यांचा हात लगेच धूनीत घातला व काही तरी काढल्यासारखे केले.

तेथील भक्तांनी बाबांना विचारले, “बाबा तुम्ही हे काय करताय?”

बाबा त्यांना म्हणाले, “काही नाही, मी भट्टीतले बाळ बाहेर काढले आहे.” ‘मी जर थोडा वेळ लावला असता तर बाळ भाजले असते.’

लोहाराला फार नवल वाटले. बाळ सुखरूपपणे आगीतून बाहेर आलेले बघताच त्याला कळले की, ही बाबांचीच कृपा आहे. तेव्हा हे सत्य होते, कारण बाबांचे हात भाजले होते. बाळाला मात्र काहीच इजा झाली नव्हती. बाबांचे नेहमी आपल्या भक्तांवर लक्ष असते.

यातून आपण बोध घेतला पाहिजे की, लहान मुलांना अग्नीपासून दूर ठेवावे. अग्नीची कधीही परीक्षा घेऊ नये.

Read Sanskar Katha in Marathi | संस्कार कथा मराठीत

9. भिल्लाचे तृप्त मन

bhillache trupt man sai baba

साईबाबांचे अनेक भक्त होते. त्यातील काही भक्त अतिशय त्यागी वृत्तीचे होते. त्यातलाच एक होता, त्याचे नाव आप्पा भिल्ल होय. आप्पा भिल्ल हा रोज मोळया विकून आपले पोट भरत असे. त्यावरच तो उदरनिर्वाह करत असे. त्याची पत्नी देखील त्याच्याबरोबर मोळी विकत असे. तो त्याला खर्चाला लागेल एवढयाच दोन मोळया विकायचा आणि त्यातूनच तो घरचे सामान आणून घर चालवायचा.

आप्पाची बाबांवर अतिशय निस्सीम अशी भक्ती होती, म्हणून तो बाबांना न चूकता तिसरी मोळी धूनीसाठी दयायचा. त्यामुळे त्याला काहीच कमी पडत नव्हते. तो त्याच्या उत्पादनातील तीस ते चाळीस टक्के भाग बाबांना मोफत देत होता. त्याच्या उत्पंनाचा १/३ भाग देत होता म्हणजे तो किती मोठया मनाचा माणूस म्हणावा लागेल. अशी मोठया मनाची माणसं आपल्याला फार कमी बघायला मिळतात. त्यांचा हा फार मोठा त्याग असतो.

आप्पा आपली मोळी बाबांना देत तेव्हा बाबा त्याला त्याचे पैसे देण्याचा प्रयत्न करायचे. परंतु तो त्यांना नाही म्हणायचा. तो त्यांना म्हणायचा, “नाही बाबा, नको, ते तुम्हाला राहू दया, तेल पाण्याला लागतील.” असे त्यागी भक्त आपल्याला कमीच बघायला मिळतात. काही भक्त बाबांकडे काही ना काही मागत असतात. म्हणजेच फक्त घेणारेच भक्त दिसून येतात. जर प्रत्येकाने आप्पासारखा आदर्श डोळयासमोर ठेवून आजही बाबांची भक्ती केली तर त्यांना काहीही कमी पडणार नाही.

आप्पा बाबांना आर्थिक मदत करू शकत नव्हता म्हणून तो त्यांना रोज मोळी देत असे.

आप्पा भिल्ल हा गरीब असूनही या आदिवासी माणसांचं हृदय हे किती मोठ आहे, हे आपल्याला या कथेतून दिसून येते. त्याचे मन जसे मोठे आहे व तो अत्यंत समाधानी वृत्तीचा आहे, त्याचप्रमाणे आपणही आपले मन मोठे ठेवू या.

Read Isapniti Stories in Marathi With Moral | इसापनीती कथा

10. बाबांचा चमत्कार

sai baba chamatkar stories in marathi

साईबाबा शिर्डीत होते तेव्हा ते दररोज नित्य नियमाने व्दारकामाईत पणत्या लावत असे. ते शिर्डीत इतर जी काही देवळे होती, त्या देवळांमध्येही ते पणत्या लावत असे. या पणत्या लावण्यासाठी त्यांना जे तेल लागत असे, ते गावातील वाण्याकडून व तेल्याकडून घेत असत. पणत्यांचे तेल आणण्यासाठी त्यांनी एक पत्र्याचा डबा तयार केला होता. रोज जाऊन तेल जमा करणे व देवळात येऊन दिवा लावणे हा त्यांचा दैनंदिनीचा भाग होता. त्यांची पणत्या लावण्याची वेळ ठरलेली होती.

एक दिवस शिर्डीमधील वाण्यांनी व तेल्यांनी म्हणजेच सर्व दुकानदारांनी ठरविले की, या फकीराला इथून पुढे तेल दयायचेच नाही. किती दिवस आपण याला तेल दयायचे? हे एक दिवस बंद करायला हवे.

बाबांच्या नियमाप्रमाणे ते डबा घेऊन तेल मागण्यास गेले तेव्हा एका दुकानदाराने त्यांना तेल देण्यास नकार दिला. बाबांना वाटले की, त्याची काही तरी अडचण असेल. ते दुसऱ्या दुकानावर गेले. तेथेही तोच अनुभव आला. त्यांना वाटले की, ते दोघेही कंटाळले असतील. मग तिसऱ्या दुकानावरही तोच अनुभव आला, मग बाबांच्या लक्षात आले. तरीपण बाबांनी तेल मागण्यासाठी सर्व दुकानावर हजेरी लावली आणि ते व्दारकामाईत आले. ते कोणालाही काही बोलले नाही. त्यांना कोणाचा राग आला नाही.

गावातील काही लोक आता बाबांच्या लीलेकडे पहात होती की, बाबा आता पणत्या कशा पेटवणार? 

त्यांच्याकडे तर तेल नाही! बाबा कोणाशी बोलत नव्हते व कोणाकडे पहातही नव्हते. बाबांनी एक डबा भरून पाणी आणले. प्रत्येक पणतीत त्यांनी तेलासारखे थोडे-थोडे पाणी ओतले. एक एक पणती पेटवून बाबा व्दारकामाईकडे पहात उभे राहिले.

जेव्हा पणत्यातील पाण्याने पेट घेतला तेव्हा तेथे उभे असलेले लोक आश्चर्यचकित झाले. ही बातमी वाणी व तेली यांच्यापर्यंत पोहोचली. गावातील सर्व लोकांना ती कळाली. सर्व लोक पाण्याने पेटलेल्या पणत्यांचा चमत्कार पहाण्यासाठी तेथे गोळा झाली. वाणी व तेली यांचा गर्व नष्ट झाला होता. ते बाबांना शरण आले. 

यावरून आपणा सर्वांच्या लक्षात आले असेल की, एखाद्या संताला किंवा फकिराला दिलेल्या दानाचे मोजमाप करायचे नसते. त्यांना जे दयायचे आहे ते देत रहावे.

‘जो संतांना दान देतो, त्याला सन्मान मिळतो.
संत व फकिर घरी येताच तुम्ही त्यांना दान करा,
परमेश्वराचे रूप घेऊन कोणीही येईल, त्याला नाही म्हणू नका.
संत जेव्हा घरात येतील, तेव्हा त्यांचे चरण स्पर्श करा.’

यातून आपल्याला असा बोध होतो की, कोणीही कोणाची परीक्षा घेऊ नये, कारण जो तो आपल्या जागी ज्ञानी असतो.

Read Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi

या होत्या काही साई बाबांच्या मराठी कथा (Sai Baba Stories In Marathi) जर तुम्हाला हि कथा आवडल्या असेल तर आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि या कथा आपल्या मित्रां बरोबर सहारे करा.

Post a Comment

Previous Post Next Post